Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जानेवारी, 2010

तो: काल सकाळी मी माझी बाईक पार्क करत होतो इतक्यात ती आली. अतिरेकी स्टाईल स्कार्फ काढला, आरशामध्ये पाहून केस ठीक केले. तिने तो जुन्या काळात लहान मुली कसा झंपर-परकर घालायच्या तसा परकर टाईप लाँग skirt घातलेला. गाडीचे साईडचे stand लावत असताना तिचा पाय ड्रेस मध्ये अडकला आणि एकदमच तीचा तोल गेला. मी जाऊन तिला आधार देणार इतक्यात दुसरा एक मुलागा तिथे आला आणि त्याने गाडी पकडली, आणि ती त्यातून व्यवस्थित सावरली. तिच्या जवळ जायची, तिला स्पर्श करायची संधी हुकली. 😦
संध्याकाळी ऑफिसमधून निघताना मी माझ्या मित्राला भेटायला वरच्या मजल्यावर गेलो आणि तेथूनच खाली लिफ्ट मधून निघालो. लिफ्ट मध्ये आणखीन एक मुलगी होती. लिफ्ट खाली माझ्या नेहमीच्या मजल्यावर थांबली. एक मुलगा आणि ‘ती’ लिफ्ट मध्ये आले. ती अगदी माझ्या उजव्या बाजूला पुढे उभी होती. म्हणजे माझ्यात आणि तिच्यात एका हाताचे देखील अंतर नव्हते. पहिल्यांदाच तिला इतक्या जवळून पाहत होतो. तिच्या perfume चा छान सुगंध येत होता. तिचा तो परकर स्टाईल पांढरा लॉंग skirt, त्यावर लाल रंगाचा top, खांद्याला लावलेली पर्स, मोकळे सोडलेले केस, छोटस हलणार कानातलं, गळ्यात नाजूक चेन आणि त्यात बदामाच पेन्दल, हातात रंगीबेरंगी बांगड्या, एकदम मस्त दिसत होती ती. लहान घुंगरू देखील होते त्या top आणि लॉंग skirt ला. त्यामुळे ती जरा हलली कि ते छुम-छुम आवाज करायचे. आणि ती मुद्दाम हलायचीहि :-). वाटले या क्षणी फ़क़्त दोघंच लिफ्ट मध्ये असावं, मग एका गुढग्यावर वाकून तिचा एक हात हातात घ्यावा आणि म्हणावं, “तनु तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो गं मी. सारखं वाटत तू समोर असावीस. डोळे झाकले तरी तूच समोर दिसतेस, प्रत्येक मुलीत तूच दिसतेस, coding करताना सुधा तुझाच चेहरा monitor वर दिसतो. कधी एकदा सकाळी ऑफिसला येतो आणि तुला पाहतो असं होतं बघ.”, हे ऐकून तिने देखील तिचा हात तिच्या चेहऱ्याजवळ न्यावा, माण खांद्याकडे नेत लाजत म्हणाव, “ईश्य्य”. असे माझे विचार चालू होतेच इतक्यात काय तर, लिफ्ट एका मजल्यावर थांबली आणि तो मुलगा आणि दुसरी मुलगी लिफ्ट मधून उतरले. काय देवा, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला का? इतक्या लगेच आमची request approved. 🙂 पण इकडे ज्या गुढग्यावर वाकायचे आणि ज्या हातात तिचा हात धरायचे वगेरे विचार केलेला ते मात्र थरथरायला लागले. (काही गोष्टी विचार करायलाच सोप्या वाटतात). आता आम्ही दोघं त्या छोट्याशा लिफ्ट मध्ये एकटे. मझं हृदय नेहमीच्याच सवयीप्रमाणे तिला पाहून ८० प्रती मिनिटाच्या वेगाने धावू लागले होते. ती देखील एका बाजूला झाली, आणि माझ्याकडे तिचा चेहरा केला, दोन सेकंद मला काही कळेनाच. तिने तिचे पेटेंत स्मित हास्य दिले, मी आपला स्तब्ध उभा. मी आपले दोन्ही ओठ शक्य तसे थोडे पसरवायचा प्रयत्न केला (त्याला हास्य तर नक्कीच म्हणता येणार नाही). मग म्हंटल, ती इतकी स्वतः होवून smile देतेय तर मग आता आपण पण थोडा पुढाकार नको का घायला. म्हंटल कुठून तरी सुरवात करू, ‘hi’ तरी म्हणू. …….. come on रोहित. say hi. yes you can do it. come on चल म्हण hi. (ह.. ह हत्तीचा, आ … आईचा … नको आईचा विचार नको उगाच). माझे शक्य तेवढे स्वतःला प्रेरणा द्यायचे प्रयत्न चालू होते. पण hi चा ‘ह’ काही तोंडातून बाहेर पडेना. तरी मी माझे प्रयत्न चालूच ठेवले. कुठेतरी प्रयत्नांची चिझ झाल्यासारख वाटल, कारण आख्खा ‘hi’ अगदी ओठांपर्यंत आलेला. तो ओठातून बाहेर पडणार इतक्यात, ‘you are at ground floor’ म्हणून लिफ्ट मधून सुंदर बाईचा आवाज आला. सत्यानास!!!!!! झालं!!!!! बोंबल्ल!!!! लिफ्टचे दार उघडले आणि ती तरा तरा निघून गेली. मी देखील मागून गेलो. पण बाई साहेब गाडीवर बसल्या आणि लगेच निघूनही गेल्या. मी देखील लगेच बाईक वर बसलो, पण आमच्या बाईकचे पण आमच्या सारखेच. ऐन लढाईत राजीनामा. चालूच होईना.
ती : मधल्या काही दिवसाचा वनवास संपला आहे. पण गाडी काही पुढे सरकत नाहीये. म्हणजे काल्चच पहा, नाही म्हंटले तर दोन अशा घटना घडल्या कि ज्याद्वारे पुढे काही घडले असते, एकमेकांची ओळख झाली असती, पण नाही, काही नाही. आम्ही जिथे होतो तिथेच आहोत.
काल सकाळी पार्किंग मध्ये तो होता, मी माझी activa पार्क करत होते, इतक्यात माझ्या लाँग skirt मध्ये पाय अडकला, आणि माझा तोलच गेला, ‘तो’ तसा पुढेच होता, मी त्याच्याकडे पाहिलेही, त्यानेही माझ्याकडे पहिले, आणि तो मला आधार देण्यासाठी लगेच पुढे सरसावलाहि, माझ्याकडे येणार तोच दुसऱ्याच एका मुलाने माझी गाडी पकडली, आणि मला उभे राहण्यास मदत केली. हे पाहून तो देखील लगेच मागे सरकला. वास्तविक आधार दिल्याबद्दल मला त्या मुलाचे आभार मानायला हवे, पण त्याला दोन थोबाडीत द्याव्याशा वाटत होत्या. कशाला मध्ये कडमाडायाचे. त्याला नुसते thanks म्हणून तिथून मी गेले.
संध्याकाळी ऑफिस मधून जायला लिफ्ट पाशी थांबले. लिफ्ट मध्ये पाहते तर काय पुढे ‘तो’ होता. देवाला मनातल्यामनात thanks म्हणाले. लिफ्ट मध्ये आम्ही दोघांखेरीच एक मुलगा आणि एक मुलगी होती. मी त्याच्या पुढे होते. जरा तिरकी माण केली, तेव्हा तो माझ्याकडेच पाहत होता. पुढे खालच्या मजल्यावर तो मुलगा आणि मुलगी उतरले. देवाला पुन्हा एकदा thanks म्हणाले. (हं काल दगडूशेठ हलवायीला गेलेले ना :-)). आता आम्ही दोघेच लिफ्टमध्ये. मी देखील लिफ्टच्या एका बाजूला टेकून उठे राहिले, जेणेकरून त्याच्या पुढे चेहरा येईन. दोन सेकंद दोघेही शांत. मग मीच त्याचाकडे पाहून एक स्माईल दिली. तो जरा डोंधळलाच होता. त्याने देखील एक हलकीशी स्माईल दिली. जणूकाही स्माईल द्यायला काही पैसेच पडतात. वाटले आता दोघे एकटेच आहोत, बोलेल काही तरी, नुसतं ‘hi’ तरी. पण नाही, कुठले काय. दोघे असेच शांत उभे. वाटले म्हणाव, “अरे मुर्खा एवढी समोर मुलगी उभी आहे अन इकडे तिकडे काय बघतोयस. आणि मुग गिळून शांत उभारायला काय झाले, दोन शब्द बोल कि खडा खडा”. आता मी दिली ना त्याला स्माईल, आणि काय करायचे मी. शेवटी मी एक मुलगी आहे. पुढाकार त्यानेच घायला पाहिजे ना. मी स्माईल देवून, हलकीशी माण हलवून कानामागे केस ढकलत शक्य तेवढे दिले ना इशारे. पण त्याला काही समजेल तर शप्पथ. शेवटी संगणक अभियंताच तो, प्रत्तेक गोष्टीत logic हुडकणार. मग वाटले काल दगडूशेठला गेलेले खरे, पण दुर्वा आणि गुलाबाचे फुल ठेवायला विसले वाटत. 😦  शेवटी लिफ्ट थांबली. मला जरा रागच आलेला, झटकन लिफ्टमधूननिघून गेले.
आणि असे हे कालचे दोन्ही प्रसंग हातचे निघून गेले.
Advertisements

Read Full Post »

रम्य संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही दिवसभरच्या ऑफिसच्या कटकटीतून, पुण्याच्या तंग रहदारीतून घरी येता. लोड शेडींग मुळे लाईट नाही, त्यामुळे लिफ्ट बंद. २-३ जिने चढून तुम्ही घराच्या दरवाजापर्यंत येता, दोनतीन वेळा घराची कडी वाजवता, आतून काही हालचाल नाही. मग रागावून जोराने दार ठोठावता, इतक्या जोरानेकी पलीकडचे जोशी बाहेर येतात आणि म्हणतात, “काय देशपांडे (असेच टोपण नाव हं), आज काय दार तोडायचा बेत आहे कि काय … हि हि हि” (हे शेवटचे नेहमीचेच असह्य होणारे हास्य हं). तुम्ही आलेला सगळा राग एक ते दहा पर्यंत आकडे म्हणत दाबून टाकता, पुन्हा दारावर आपटण्यासाठी उगारलेली मुठ थोडी सैल करत हलकीशी थाप मारता. इतक्यात आतून ‘सौ’ दार उघडतात. “दार उघडायला इतका उशीर लागतो का?” असे तुम्ही जरा वरच्या पट्टीतल्या आवाजात म्हणता, तोवर सौ आत गेल्या असतात. तुम्ही हातातली पिशवी (म्हणजे bag … पिशवी म्हणायला बरे नाही वाटत :-)) टाकता, शूज काढता आणि आत जाता. हात पाय धुवून बाहेर येवून बसता तोवर आतून ‘सौ’ हिंदी मालिकांमध्ये घालतात तशीच नवी कोरी, नव्या fashion ची साडी घालून अगदी नटून-थाटून बाहेर एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात कांद्याच्या भजीची थाळी घेवून येतात. तुमचा आलेला सगळा राग क्षणात गायब. तुम्ही आपलं उगीच खोटं खोटं, “अगं कशाला उगीच एवढं सगळं केलंस?” त्यावर सौ,”अहो दिवसभर तुम्ही दमून आल्यावर नको का बायकोने चहा आणि खायला काही द्यायला?”

…….. वाह. किती छान दृश आहे ना. तुम्ही देखील हरवून गेलात ना स्वप्न दुनियेत. पण थांबा जरा. तुमची बायको काम करत असेल किंवा तुम्हाला नोकरी करणारी मुलगी हवी असेल तर तुम्हाला अशी स्वप्ने बघण्याचा सुद्धा हक्क नाही, तुमच्यासाठी ते पाप आहे. त्यामुळे जर का नोकरी करणारी बायको असेल किंवा हवी असेल तर तिच्याकडून अशा काही वागणुकीची अपेक्षा ठेवू नका. अनेकवेळा तुमच्या पेक्षा तीच उशिरा येण्याची शक्यता असेल, आणि मग कदाचित तुम्हालाच चहा आणि कांद्याच्या भजीची थाळी घेवून यायची वेळ येईल. 🙂 (चहा ठीक आहे पण कांद्याची भाजी म्हणजे ……..)

त्यामुळे सगळ्या लग्न इच्छुक मुलानो आत्ता पासूनच जेवण, नाष्टा म्हणजेच एकूणच स्वयंपाक शिकायला सुरवात करा.

वेल थट्टा बाजूला ठेवा … पण खरच स्वतः बनवून खायची मजाच काही और आहे. भले ते थोडं खारट किंवा तिखट असो. पण खरच मजा येते जेवण बनवायला. सुरवातीला पदार्थ खारट वा तिखट व्हायची शक्यता जास्ती आहे पण नंतर मीठ आणि तिखटाचा अचूक अंदाज येईल. आणि काही दिवसातच अगदी चविस्त नाही पण खाण्यायोग्य जेवण नक्कीच बनवू शकाल. अहो खरच तसं फार सोप्प आहे हो जेवण बनवणं. या बायका उगाचच जेवण बनवा म्हणजे समजेल वगेरे ताणे मारत असतात आपणा पुरुषांना. हं ज्या बायका चविष्ट जेवण बनवतात म्हणजेच सुग्रण वर्गात बसतात त्यांना नक्कीच हा हक्क आहे. पण ठीक-ठाक जेवण ज्या बायका बनवतात त्यांच्याशी नक्कीच तुम्ही स्पर्धा करू शकता. ज्या मुली करियर, शिक्षणाचे नाव सांगून जेवण बनवता येत नाही म्हणून कारणे देतात त्यांच्याबद्दल मला खरच वाईट वाटते. अहो एखाद्याला जेवण देवून, त्याची भूक भागवणं यासारखे दुसरे पुण्य नाही. अहो म्हणतात ना नवऱ्याच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो :-), आणि या आजकालच्या (काही) मुलीना हा मार्गच माहित नाही.

खरच जेवण बनवणं (खाण्यायोग्य) तसं सोप्प आहे. अहो खरच. आता माझ्यासारख्या मुलाला (पुण्यात नोकरीसाठी येण्याआधी) स्वयंपाकघर म्हणजे एक ठिकाण जेथे (माझ्या सुग्रण आईकडून) तयार जेवण मिळते असेच वाटत होते, तो ‘मी’ आज विविध प्रकारच्या भाज्या, भात, खिचडी, पोहे, उप्पीट (पोळ्या आणि चपाती सोडून हं … अजून तिथवर मजल नाही गेली … ते माझ्या होणाऱ्या बायकोसाठीच राखून ठेवलंय :-)) वगेरे पदार्थ बनवू शकतो, तर जगातला कोणताही (आळशी :-)) मुलगा बनवू शकतो. अहो घरी आईला जेव्हा मी जेवण बनवतो हे कळलं, तेव्हा तिचा विश्वासच बसेना.

काही नाही आधी प्रत्येक मानसी ३ मुठी याप्रमाणे तांदूळ घ्या, त्यात तांदळाच्यावर निम्मे बोट बुडेल त्याच्या थोडे कमी इतके पाणी घाला, चवीप्रमाणे मीठ. आणि ठेवा शिजवायला. भाजी साठी भाजी आणि कांदा कापा. कढईत थोडे तेल तापवायला ठेवा त्यात मोहरी, जिरे मग लसून थोडावेळ ठेवा, मग कांदा थोडा लाल होवू पर्यंत, मग हळद, तिखट, गरम मसाला आणि नंतर तुमची भाजी, थोडं मीठ. सगळं अधून मधून हलवा. थोडावेळ शिजत ठेवा. झाली भाजी. (सगळी रेसेपी नाही लिहिली नाहीतर रेसिपी चा पोस्त झाला असता). भाजी कोणतीही असो सेम रेसेपी. 🙂

फ़क़्त तो कांदा कापायचा भाग जरा…… अवघड जातो. आधी जरा जास्तीच जायचा, पण कांद्याचे दोन भाग करून पाण्यात धुतल्यावर कापायला घेतले कि डोळ्यात पाणी कमी येते. अर्थात चिरण्याआधी कांद्यावर घातलेले पाणी is inversely proportional to कांदा चिरताना डोळ्यातून येणारे पाणी :-). मी असे ऐकलेले की, कांदा चिरताना त्याचे टरफल डोक्यावर ठेवले तर डोळ्यातून पाणी कमी येते :-). मी तसे करूनही पहिले पण काही उपयोग नाही झाला :-). मी तर एक व्यक्ती कांदा चिरताना हेलमेट घालतो असे ऐकले :-). पण कांदा चिरण्याचा एक फायदा म्हणजे डोळे धुवून निघतात. (बायको किंवा GF चा तेव्हा फोन आला तर श्वास घेताना नाकातून येणाऱ्या आवाजाने तिला किती miss करतोय देखील सांगता येते :-)).

लग्नाआधी मित्रांबरोबर रूमवर स्वतः जेवण बनवायचा आणखी एक फायदा म्हणजे जेवल्यानंतर भांडी घासायला लागत नाही, ती जबाबदारी इतर खाणारे उचलतात. रोज तर शक्य नाही पण अधून मधून, सुट्टीला रूम वर जेवण बनवायची मजा येते.

पण स्वतः जेवन बनवून खाताना जो आनंद, समाधान मिळते ते काही औरच. ते साधारण जेवण जेवताना इतकं बरं वाटत आणि तेव्हाच घराच्या आईच्या खाण्याची पण आठवण येते. आधी घराच्या जेवणाला, नावडत्या भाजीला कधीतरी ठेवलेल्या नावाची आठवण येते आणि वाईट वाटू जाते.

आणि हो मुलाला जेवण बनवायला येते म्हंटल्यावर लग्नाच्या बाजारात थोडी किंमत देखील वाढायची शक्यात आहे. 🙂

थोडक्यात काय तर घरकी मुर्गी मुर्गी (च) बराबर , जेव्हा ती स्वतः बनवलेली असते.

या लेखातून कोणाही स्त्रियांना दोष देण्याचा बिलकुल हेतू नाही. 🙂 infact ज्या सुग्रण स्त्रिया आहेत किंवा ज्या नोकरी सांभाळून स्वयंपाक सांभाळतात त्यांची मेहनत जाणीवपूर्वक कळून येते, त्या खरच ग्रेटच आहेत. प्रश्नच नाही.

Read Full Post »

ती : शी बाई…… याला काय अर्थ आहे. ठीक आहे झाली माझ्या हातून चूक, माणते ना मी. म्हणून काय एखाद्याने इतके वाईट वागावे. किती दिवस झाले तो माझ्याकडे पहात देखील नाही. मी आपली मुद्दाम तो पुढे आले कि त्याच्याकडे पाहते, त्याला एक स्मित हास्य द्यायचा प्रयत्न करते, पण तो माझ्याकडे पाहिलं तर शप्पथ. पुढे आलाच तर लगेच दुसरीकडे मान वळवून निघून जातो. किती बाई एखाद्याला दुखवायचे म्हणते मी. त्याचं असं वागणं पाहून वाटलं झालं आता, संपलं सारं ……. पण नाही, थोडा का होईना त्याच्यात फरक दिसून आला.

त्याचे झाले असे. परवा मी अशीच pantry (ऑफिस मध्ये चहा प्यायची आणि timepass करायची जागा) मध्ये चहा पीत उभी होते. संध्याकाळची वेळ होती. थोडा कंटाळाच आला होता, उदास वगेरे म्हणतात ना असं काहीस वाटत होतं. चहा पीत खिडकीपाशी एकटीच उभी होते. पुढे sliding ची खिडकी होती. चहा कधी संपला ते समजेलच नाही, मी तशीच चहाचा मोकळा कप घेवून उभी होते. बाहेर सूर्यास्त होत होता. आकाश लालसर – केशरी झाले होते. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते. (आणि कंपनीतले बरेचसे लोक सुद्धा :-)). इतक्यात pantry मध्ये ‘तो’ आला. पहिल्यांदा माझे लक्षच नव्हते. मी आपली माझ्याच नादात सूर्यास्त पाहण्यात मग्न होते. तो आला आणि मी पुढे आहे हे पाहून तिथेच मागे थांबला. तो माझ्या मागे म्हणजे मागे थोडा उजव्या बाजूला होता. त्यामुळे तो मला एका बाजूने पाहू शकत होता. तोवर मीही ध्यानावर आले होते, तो मागे आहे हे मला उमजले होते. तो मला समोरच्या खिडकीच्या काचेतून दिसत होता. मीही काही हलले नाही, आहे तशीच उभी राहिले (त्याच्याकडे खिडकीच्या काचेतून पाहत). आम्ही जवळपास अर्धा एक मिनिट असेच (अप्रत्यक्ष) एकमेकांकडे (एकमेकांना नकळत) पाहत होतो. अनेक दिवसांनी हा योग जुळून आला होता. दोघेही पहिल्यासारखेच (एकमेकांमध्ये) हरवून गेलो होतो. मी जणू त्याला नजरेच्या भाषेतून, “का रे, का बर असं वागतं आहेस माझ्याशी? किती म्हणून एखाद्यानं सहन करावं” वगेरे तक्रार करत होते. तो देखील जणू नजरेच्याच भाषेतून, “तू कशी वागलीस आधी माझ्याशी? तेव्हा नाही विचार केलास किती वेदना होतील माझ्या हृदयाला” म्हणून उलटी माझीच तक्रार करत होता. आमचे असे नजरेच्या भाषेतून तक्रारसत्र कम प्रेमपर भाष्य चालूच होते, इतक्यात कोणीतरी कडमडले . pantry मध्ये कोणीतरी आले. दाराच्या आवाजाने दोघेही एकदम दचकलो. त्याने लगेच चहा घेतला आणि निघून गेला. अनेक दिवसांनी झालेल्या या नजर भेटीने मीदेखील थोडी सुखावले. मगाशी आलेला उदासपणा एकदम निघून गेलेला. एकदम कसं ताज-तावणं झाल्यासारखा वाटत होतं. तो पर्यंत सूर्य पूर्ण अस्ताला गेला होता, आणि त्याच प्रमाणे आमच्यातला इतक्या दिवसातला नजरेतला दुरावाही (hope so).

तो : या पोरीचे काही कळत नाही. म्हणजे मला तसे कोणत्याच मुलीबद्दल काही कळत नाही. आणि कदाचित सगळ्या मुलांचे देखील असेच असावे, भले एखादा मुलगा मुलांपेक्षा मुलींमध्येच  जास्ती रमणारा असला तरी त्याला मुलींबद्दल फार काही कळले असावे असे नाही वाटत मला. असो तो त्याचा प्रश्न आहे. (पण म्हणतात ना स्त्रीचे हृदय आजवर कोणत्या पुरुषाला समजले आहे? स्त्रीच्या हृदयाची खोली समुद्राएवढी असते वगेरे म्हणतात. …. हे एकतर स्त्रियांना किंवा जे समुद्राची खोली मोजतात त्यांनाच माहित. असो)  पण या मुलीचे म्हणजे काहीच कळत नाही राव. म्हणजे आधी वाटले होते तिला असावा थोडा फार रस माझ्यामध्ये, मग बाईसाहेब एकदमच banded queen प्रमाणे खुन्नस देवून पाहू लागल्या माझ्याकडे. बर ठीक आहे झाले असेल काही तरी. आणि आता पुन्हा पाहिल्यासारखंच. पुन्हा ते स्मित हास्य. च्या मायला!!! एकूणच अवघड प्रकरण आहे. म्हणून आपण आपले या प्रकरणापासून लांबच राहिलेले बरे असे मी ठरवले होते. पण परवा असाच pantry मध्ये चहासाठी गेलो होतो तेव्हा ‘ती’ पुढे खिडकी शेजारी उभी होती. जरा उदासच वाटत होती. मी देखील पहिल्यांदा २ सेकंद थांबलो. पण ती तशीच उभी होती, खिन्न चेहऱ्यानं. नाही यार ……. इतकी छान मुलगी अशी उदास बिलकुल बघवत नव्हती. आधी कधी तिला असे पहिले नव्हते. नेहमी तिला कसे प्रसन्न, हसताना पाहिलंय (हा ते खुन्नस वालं look सोडून हं). त्यामुळे तिला असं खिन्न चेहऱ्यानं पाहवत नव्हतं. माझ्यामुळे तर ती अशी उदास झाली नसेल. हो ना आज काल ती समोर आली कि माझ्याकडे पाहते, नकळत एक स्मित हास्य देते (हसताना छान दिसते हं ती ), आणि मी मात्र तोंड फिरवून निघून जातो. त्यामुळे तर …… ओह्ह्ह नो. आयुष्यात कुणाला हसवता आलं नाही, कुणाला सुखी करता आलं नाही तर एकवेळ चालेल पण कुणाला दुखी तर करू नये. वाटलं तिच्या जवळ जावं, तिच्या खांद्यावर हात ठेवावा आणि म्हणाव, “don’t worry, सगळं काही ठीक होईल”. (आल इझ्झ वेल :-)). वाटलं तिच्या जवळ जावून गाणं म्हणावं, “तेरे दुख अब मेरे, मेरे सुखअब तेरे, ……….. ओह मेरे जीवनसाथी ……”. पण नाही…… इथच तर आमचं घोडं आडत. फ़क़्त तिच्याकडे पाहत राहिलो. तिला समजलेपण नसेल. इतक्यात कोणीतरी आलं, आणि मी चहा घेवून गेलो.

Read Full Post »

‘3 idiots’ पाहून आल्यापासून या लाईन्स अधून मधून माझ्या मनात येतात. चित्रपट म्हटलं कि कुठेतरी नक्कीच वास्तवापेक्षा चित्र जास्ती रंगवून दाखवलं जात हे मानलं तरी वाटत होतं यार career career चा विचार करताना कॉलेज life कुठे तरी एन्जोय करायची राहून गेली कि काय?

कॉलेज जीवनाला आयुष्यातील सोनेरी दिवस म्हंटले जाते. इथेचे तुम्ही लाईफ खरी एन्जोय करता. शाळेतले नियम इथे शिथिल झालेले असतात, नवीन नवीन ब्रांड, fashion च्या कपड्यांनी शाळेच्या गणवेशाची जागा घेतली असते, दिवसाचा बराचसा वेळ क्लास रूम पेक्षा कॅन्टीनमध्ये नाहीतर चहाच्या टपरीवर जात असतो, अनेकवेळा इथेच तुम्हाला जीवनातले लॉंग-टर्मचे मित्र मिळतात, काहीना त्यांचं प्रेम इथेच मिळतं वगेर वगेरे. पण इथूनच तुमचे profeessional लाईफचा पाया रचला जातो. त्यामुळे जितकी हि लाईफ एन्जोय करायची असते तेवढीच भविष्याच्या दृष्टीने महत्वाची असते.

आणि याच द्विधा मनास्तीतीत बरीचशी मुले असतात. लाईफ एन्जोय करू कि आभास करू. कारण दोन्ही गोष्टी balance करायच्या थोड्या अवघडच असतात. फारच थोड्यांना ते जमत.

आणि असे करत करत पुढे चांगली नोकरी वगेरे मिळवून लाईफ सेटल वगेरे झाली कि मग हे ‘3 idiots’ सारखे चित्रपट पाहून किंवा आज-कालची कॉलेजची पोरं पाहून वाटत पुन्हा ते दिवस यावेत आणि पुन्हा त्या गोष्टी एन्जोय कराव्यात किंवा career चा विचार करता-करता ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात त्या कराव्यात. म्हणून म्हणावस वाटत देवा, ‘Give me another chance I wann grow up again’

सकाळच्या practicle चा नाद सोडून मस्तपैकी हन्तरुनात लोळायचं, टपरीवरचा तो ‘cutting’ चहा, सकाळचे मस्त गरमागरम पोहे-उप्पीट खायचंय , चार-पाच मित्र मिळून ओढत असलेली ती cigrate त्यांच्याबरोबर ओढयाचीय, येता-जाता पोरींवर लाईनी मारायाच्यात, अनोळखी २-३ मुली येताना बघून हि लाल माझी, हिरवी तुझी असं करायचंय, मित्राला त्याच्या आवडत्या मुलीने नुसते त्याच्याकडे पाहून हसलेल्याबाद्दल्ची पार्टी घ्यायचीय, कॉलेज बंक करून सिनेमा पाहायचाय, गर्ल्स होस्टेल पुढे तासंतास निवडक मुलीना पाहण्यासाठी थांबायचंय, सुंदर मुलींसाठी बस stop वर एका नंतर एक बस सोडायचीयेय, बाईक वरून धूर आणि मोठा आवाज काढत सारं कॉलेज जागं करायचं, कॅन्टीनमध्ये  thumps – up शाम्पेन सारखी उडवयाचेय, छापा-काटा करून आज movie बघायची का lectuer ला बसायचे हे ठरवायचंय, lecture साठी एका वेळेस दहा मित्रांची हजेरी लावायाचेय , क्लास मधल्या मुलींची पाहून काहीही न समजता assignments पूर्ण करायच्यात 🙂

lecture चालू असताना फ़क़्त तिच्याकडेच पहायचय, तिच्याकडून घेताल्येल्या वहीत तिने ठेवलेल्या गुलाबाचा सुगंध घ्यायचाय (भले तो सुकलेला का असेना), तिच्या वहीतील सुंदर अक्षर पाहून ‘हे इतकं सुंदर अक्षर तुझ्यासाठीच काढलंय रे’ हे समजून घ्यायचय, तिच्या डोळ्यातील भाव वाचायचेत (भले ते तिच्या चष्म्यापलीकडे का असेनात), पिकनिकला तिच्याकडून आळूची वडी घेताना ‘हि फ़क़्त तुझ्यासाठीच केलीय मी सकाळी लवकर उठून’ हे समजावून घ्यायचय, तिने घातलेला yello ड्रेस हा फ़क़्त मला yello रंग आवडतो म्हणून हे समजून घ्यायचय, तिने तिच्यात जाणीवपूर्वक केलेले बदल समजावून घ्यायचेत, तिच्या वाढदिवसाला नुसत्या अभिनंदनाबरोबर छोटंसं का होईना एक छान गिफ्ट द्यायचय, बाईक वरून तिला फिरवायचंय, पाऊस पडत असताना तिला कॉलेज ते तिची रूम पर्यंत भिजत सोडायला जायचय, वाटेतच  तिच्याबरोबर कॉफी घ्यायचेय.

practicles चे मार्क्स कमवायचा नाद सोडून सर-madam वर कॉम्मेंतस करायच्यात, नवीन प्रोफेस्सोरला पिडायचय, नवीन जॉईन झालेल्या सर आणि madam ची गोस्सिपिंग करायचेय, कोणाला ठाऊक नसताना दोन क्लास मेट्सचे प्रेम प्रकरण सगळ्या कॉलेज भर करायचेय, उगाचच काही नसताना दोघात काहीतरी चाललेय अशी अफवा उठवयाचेय, डेस्कवर, क्लास रूमच्या भिंतींवर बदामात क्लासमेट्सची नावं लिहायाचीयेत, toilet literature मध्ये भर घालायाचीय 🙂 रात्र-रात्रभर सगळे मिळून कॉम्पुटरवर ‘फिल्म्स’ बघून क्लास मध्ये झोपायाचेय, पोरीना टोपण नावं ठेवायाचेत, मित्रांबरोबर कट्ट्यावर बसून timepass करायचाय.

होस्टेल मध्ये सकाळी बाथरूम साठी मित्रांशी भांडायचंय, रूम मध्ये ‘भारी-भारी’ ललनांची पोस्टर्स लावायचेत, कॉलेज मध्ये radioवर घोळक्यात match ची कॉमेंट्री ऐकायाचेय, भारत जिंकणार कि  पाकिस्तान यावर पैजा लावायाच्यात, chocolate डे ला सगळ्यांना chocolate, rose डे ला सगळ्या मुलीना (मग त्या काकू बाई टाईप का असो) गुलाब द्यायचाय, friendship डे ला कुठल्याही मुलीला बिनधास्त friendship ‘मागायची’य, valentine डे ला एकट्यात का होईना तिला प्रोपोज करायचंय, क्रिकेट, फुटबाल, नाटक यात भाग घ्यायचाय, कॉलेज टीमची match जिंकल्यावर, गाद्रीन्ग्ला बेधुंद नाचायाचय, traditional डे ला मावळ्याचा, पेशव्यांचा वगेरे ड्रेस घालायचाय,  नवीन students चे राग्गिंग (एका लिमिट मध्ये) घ्यायचय, तिला ‘प्रेम पत्र’ लिहायचेय, ती नाहीच म्हणाली तर मग तिच्या मैत्रिणीवर तरी लाईन मारायाचेय.

मित्रांच्या वाढदिवसाला रात्री बाराला उठून केक कापयाचाय, सगळे मिळून त्याला बर्थडे बम्प्स द्यायच्यात, रूममेटने घरून आणलेला फराळ हळूच रात्री फस्त करायचाय, आखी सेमिस्तर झोपा काढून ऐन exam च्या वेळेस रात्रभर जागून आभ्यास करायचाय, पपेर लिहितानासुद्धा तिला पपेर लिहिताना, तिच्या तोंडावरचे भाव पाहायचेत, शेवटचा पपेर झाल्यावर कॉलेजभर दंगा धुडगूस घालायचाय, exam मध्ये सगळ्या विषयात पास झाल्यावर कॉलेजमध्ये फटक्याची माळ लावायाचेय.

शेवटच्या वर्षी कॉलेज संपायच्या आधी सगळ्या क्लास मेट्सनी जमायाचय , सर-madam च्या नकला, कॉलेज मध्ये झालेले किस्से, गाणी, नाच वगेरे करून दंगा धुडगूस घालायचाय, पूर्ण कॉलेज संपेपर्यंत खुन्नस खालेल्ल्या मित्राला एकदा जादू की झप्पी द्यायचीय, आणि शेवटच्या दिवशी कॉलेज सोडताना मात्र डोळे पुन्हा पाण्याने भरून अनायचेत.

म्हणून सारखा वाटत देवा, ‘Give me another chance I wann grow up again’.

Read Full Post »

‘निरमा’ ची नवी ad

एक पांढरी शुभ्र साडी घातलेली बाई रस्त्यावरून चालली असते. पुढे एक डबके असते. इतक्यात तिथून एक गाडी वगेरेचे चाक त्या डबकयामधून जाते, आणि त्या डबकयामधून पाणी उडते, तेव्हा ती बाई नेमकी तिथेच असते आणि ते डबक्यातून उडालेले पाणी तिच्या साडीवर पडणारच असते. इतक्यात ती त्या उडालेल्या पाण्याकडे बघते आणि त्याकडे बोट दाखवत (जशा शाळेतल्या बाई मुलांना रागवताना त्यांच्याकडे एक बोट दाखवून रागावतात तशा) निरमाचे नेहमीचे गाणे म्हणते. ‘दुधसी सफेदी निरमासे आई, ……….. सबकी पसंद निरमा’ असे काही तरी. आणि ते उडालेले पाणी देखील तिथेच थांबते (pause होते) आणि निमूटपणे शाळेतल्या मुलासारखे बाई काय सांगत आहेत ते ऐकते. मग ती बाई पुढे जाते. (अजून पाणी pause मधेच हं). मग थोडे पुढे जाऊन, मागे पाण्याकडे पाहून ती म्हणते ‘निरमा’ आणि मग ते पाणी खाली पडते. 🙂

पहिल्यांदी जेव्हा मित्रांबरोबर हि ad पहिली तेव्हा जाम हसलो होतो.

Read Full Post »

तो : काय झालाय तिला कोणास ठाऊक? बिलकुल नाही देत माझ्याकडे ती लक्ष. कदाचित कोणी दुसरा मिळाला असेल. पण कंपनीत तरी नाही कोण बरोबर दिसत. कदाचित बाहेरचाच असेल एखादा. अरे पण म्हणून माझ्याशी अस वागायचं म्हणजे……… जाऊदे. मला देखील उगाच तिच्याकडे जास्ती नाही पाहायला पाहिजे. एखादा इथलाच असेल तर, उगाच गैरसमज नको व्हायला त्याला. पुण्यात येताना किती ओढ होती तिची आणि …… जाऊदे चालायचच.    ‘तू क्या जाने …….. बेवफा …. ओह बेवफा’. पण नाही ना जिथे अजून ‘वफा’च  नव्हती  तर तिला ‘बेवफा’ म्हणण्यात काय अर्थ.  जाऊदे …………………..’तू नाही तो कोई और सही….’

 ती : काल lunch वरून मी आणि माझी मैत्रीण येत होतो तेव्हा तिचा एक मित्र भेटला. बोलता बोलता तो त्याच्या एका टीममेट बद्दल सांगत होता. त्याचा तो टीम मेट onsite ला गेला होता, आणि त्याची onsite होती ‘नागपूर’ ला. ऐकल्यावर हसूच आले. हो ना. त्यांनी पण सगळ्यांनी त्याच्या त्या मित्राची खूप  खेचली होती वगेरे वगेरे सांगत होता. इतक्यात ‘तो’ पुढून गेला (माझ्याकडे न बघताच, हो आज-काल न बघताच जातो तो). तेवढ्यात या माझ्या मैत्रिणीच्या मित्राने त्याच्याकडे बोट दाखवत सांगितले, हाच तो ‘नागपूर’च्या onsite ला गेलेला. आणि मग तो मित्र गेला. तर ‘आमचा हा’ नागपूरला गेलेला. onsite ला. :-). पण ….. अरे बाप रे. आणि मी तर हा US ला onsite ला गेलेला आणि त्यामुळे भाव खातोय वगेरे समजत होते. oh shittt. फारच ignore केले मी त्याला. ignore काय काहीदा तर खुन्नस देवूनही पहिले. हं……. बरोबर ………म्हणूनच तो आज काल माझ्याकडे मुळीच पाहत नाही. बरोबरच तर आहे त्याच. मी जर असे वागले असेल तर कसे वाटत असेल त्याला. in fact मध्ये तर त्याचा चेहरा पडल्यासारखा पण वाटत होता. ohhh no. माझ्यामुळेच असेल. हो ना आधी होता तो माझ्याकडे नकळत पाहत, पण आता तर मुळीच नाही. आता काय बरे करावे. सरळ जावून बोलावे का त्याच्याशी? पण काय म्हणून बोलावे. सांगू का….. कि बाबारे चुकल  माझं, थोडा गैरसमज झालेला माझा. पण कस सांगू?  अस कस सांगायचं पण एकदम.  शी बाई काही काळेच ना.

Read Full Post »