तो : शेवटी मी तिच्याशी बोललो, आणि तेहि स्वताहुन. हं आता हे बोलणे फ़क़्त ‘हाय’ पर्यंतच सीमित होते, पण तरीही सुरवात मी केली. रूमवर मित्रांना अगदी छाती फुगवून माझा हा पराक्रम सांगितला.
यावेळचा valentine डे रविवारी आलेला. सालाबाद प्रथेप्रमाणे मी आपला एकटाच होतो. बाहेर जायचं म्हटलं तर हि जोडपी पहिली कि जास्तच एकट असल्याचं जाणवतं. म्हणून सगळा दिवस रूमवर निवांत झोपून काढला. रात्री relationship status ‘single’ आसलेल्या मित्रांबरोबर मदिरा प्राशन करत हा valentine डे, आणि तो साजरा करणारे किती मूर्ख आहेत या विषयावर चर्चासत्र केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी मात्र ऑफिसला जाताना रोडवरती फुलांच्या दुकानात तो टवटवीत लाल गुलाब पाहिल्यावर मात्र राहवलं नाही. कसलाही विचार न करता तिला देण्यासाठी एक गुलाब घेतला आणि bag मध्ये ठेवला. (पण काय हो साधा एक गुलाब एवढा महाग?)
ऑफिसमध्ये कालजरी valentine डे झाला असला तरी बर्यापैकी इफेक्त जाणवत होता. खास करून नवीन भारती झालेल्या फ्रेशर मुला-मुलींमध्ये.
पण अजून ती काही दिसली नव्हती. ती दिसेनम्हणून ३-४ वेळा प्रिंटऔट, कॉफी वगेरे घ्यायच्या नादाने तिच्या cubicle कडून फेऱ्या मारल्या होत्या पण तिचे काही दर्शन झाले नव्हते. ११ च्या सुमारास सहजच टीम लीड (TL) शी बोलण्यासाठी उभा होतो, तर पुढून ती येताना दिसली. सोबत दोन मैत्रिणी होत्या. गुलाबी सलवार कमीज मध्ये ती एकदम गुलाबाच्या कळीप्रमाणे खुलून दिसत होती. (आणि आता कळले चित्रपटात हिरोईन बरोबर सुमार दिसणाऱ्या तिच्या मैत्रिणी नेहमी का असतात ते :-)) पुढे TL होती आणि समोर ती, TL कडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते, आणि तिच्याकडे काही केल्या दुर्लक्ष होत नव्हते. कसेबसे TL शी बोलणे संपवले. एकदम लक्ष bag मध्ये ठेवलेल्या गुलाबाकडे गेले. हात bag कडे जाणार तोच अनेक प्रश्न समोर येवून ठाकले.
तिला देण्यासाठी गुलाब घेतला खरा, पण काय म्हणून देणार? आता पर्यंत फ़क़्त ‘हाय’ हेच बोलणं झालं होतं. तिच्या मनात काय आहे कोणास ठावूक? कोण जाणे ती प्रत्येकाशी इतक्या चांगल्याप्रकारे वागत असेल, आणि मी आपला याला ‘प्रेम’ समजत असेल. कोण जाणे तिचा कोणी तरी असेलही. आणि जर मी तिला गुलाब दिलाच, आणि तिने नाही म्हटलं तर? ऑफिसमध्ये जायची पंचायत होईल. परवा कंपनीच्या induction document manual मध्ये ‘woman harrasement’ बद्दल वाचलं होतं असंच काहीतरी. बापरे!!!
पण खरच ती कशी चुलबुली आहे, नेहमी हसत-खेळत असते, लोकांमध्ये लगेच मिसळते. या उलट मी, तसा थोडा soft spoken, लगेच लोकांमध्ये मिसळायला नाही जमत मला, हो पण एकदा चांगली मैत्री झाली कि मग बिन्दास्त जमते त्याचाशी. ती पुण्यात वाढलेले, मी आपला लहान शहरातून पुण्यात आलेला. किती फरक आहे आमच्या मध्ये, कस काय जमेण आमचं?
मघाशी अगदी लगबगीनं घेतलेलं पाऊल थोडं मागे घेतलं.
पण मन काही मानेना, सारखं लक्ष bag मध्ये ठेवलेल्या गुलाबाकडे जात होतं. वाटत होत बिनधास्त जावं आणि तिला गुलाब देवून यावं. पण काही ध्येर्य होत नव्हतं.
तेवढ्यात client कडून दोन बग असाईन झाले, आणि मी ते सोडवण्यात व्यस्त झालो.
संध्याकाळी ऑफिस मधून निघताना communicator (कंपनीत इंटर्नल चालणारा messenger) वर तिचं status offline दिसलं.
रात्री रूमवर आल्यावर bag मधला गुलाब पहिला, त्यानं देखील माझी वाट बघून बघून कंटाळून मान टाकलेली. :-(.
मी त्याची मान सरळ केली आणि त्याला “Java Complete Reference” च्या पुस्तकामध्ये ठेवले.
ती : या वेळेस रविवारी valentine डे होता. दिवसभर friends कडून Valentine डे चे SMS, call येत होते. TV वर, रेदिओ वर सकाळपासून मस्त romantic गाणी येत होती. मस्त वाटत होतं. दुपारी एक फोन आला आणि माझा मूडच ऑफ झाला. एका जुन्या मित्राचा, रवीचा होता तो फोन. valentine डे वीश करायला. आम्ही आधीच्या कंपनीत दोघे एकत्र होतो. रवी तसा बोलका, दिसायला हंड्सम. म्हणजे प्रथम दर्शनी कोणत्याही मुलीला आवडेल असा. माझी आधीची कंपनी तशी लहानच होती, ३०-४० लोक असतील. त्यात मुली आणि त्याही सिंगल कमीच. रवी कोणत्याही मुलीशी येवून बिनधास्त बोलायचा. माझ्याशीही एकदा असाच येवून बोलला आणि हळू हळू आमचे वरचेवर बोलणे वाढले. कॅफेटेरियामध्ये एकटे lunch, snacks घेणे चालू झाले. ऑफिसनंतर बाहेर जाणे वाढले. आमची जवळीक वाढली. मला तो आवडू लागला. मी तसे त्याला बोलूनही दाखवले, पण त्याने ते चेष्टेवारी नेले. त्याच्याकडून तशी काहीच commitment नव्हती. मला वाटले त्याला थोडा वेळ हवा असेल. पण नंतर कळले माझ्यासारख्या त्याच्या आधीहि ‘मात्रिणी’ होत्या. मी म्हणजे त्यांतली एक. आयुष्यात पहिल्यांदाच कोणी इतका जवळचा वाटलेला, पण तोही असा निघाला. तेव्हापासून मी त्याला टाळू लागले. नंतर कंपनी बदलली आणि त्याच्याशी संपर्कही तुटला.
पण मला माहित होते ‘रोहित'(‘तो’) रवीसारखा नाही. तसा फारसा बोलका नाही. भले अजून आमची फारशी ओळख नाही, आमचे प्रत्यक्ष बोलणे झाले नाही, पण कुठे तरी वाटते फार जुनी ओळख आहे, आणि डोळ्यांच्या भाषेत भरपूर बोलणे होते.
आज valentine डे नंतरचा ऑफिसचा पहिला दिवस. सारखं वाटतं होतं त्याने यावं आणि मला एक गुलाब द्यावा. पण आता त्याचा स्वभावही थोडाफार माहित झालेला, त्यामुळे असे काही व्हायची चिन्हे कमीच, पण तरी वाटतं होतं त्याने यावं.
सकाळ पासून दिसला नाही तो. म्हणून त्याच्या डेस्क पुढूनही जाऊन आले. पण तिथे नव्हता तो. नंतर दुपारी मात्रीनिबरोबर जाताना डेस्कपाशीच उभा होता त्याच्या TL शी बोलत. मी माझ्या मैत्रीन्बरोबर होते, त्याचे एकदम माझ्याकडे लक्ष गेले, आणि दोन सेकंद तो माझ्याकडेच पाहत उभा होता. पुढे TL असल्याने लगेच त्याने त्याचे बोलणे continue केले. अमृतालाही (माझ्याबरोबरची मैत्रीण) त्याचे माझ्याकडे पाहणे जाणवले. लगेच तिने मला भरभर चालायला सांगितले. अमृताला तो तितकासा नाही आवडत, म्हणजे तसे तिने स्पष्ट बोलून नाही दाखवले, पण तिच्या वागण्यावरून वाटते तसे. का कोण जाणे?
पण नंतर पूर्ण दिवस नाही दिसला तो.
वाटले त्याच्या डेस्क जवळ जाऊन बसावे आणि म्हणावे, अरे मुर्खा आजचा दिवस काय, आणि तू करतोयस काय? एवढी सुंदर मुलगी समोर असताना त्या निर्जीव कॉम्पुटरच्या स्क्रीन कडे लक्षच कसे जाते तुझे? मी समोर असताना माझ्याशी बोलावे, मला एखादा गुलाब द्यावा, खरा-खुरा नाही तर एखादे e -greeting तरी पाठवावे. पण नाही. पुरता अरसिक, unromantic आहे. मंदच आहे कुठला.
शेवटी संध्याकाळी निघताना त्याच्या डेस्क पुढूनच गेले, पण तो त्याच्या कॉम्पुटरच्या स्क्रीन मध्ये डोक खुपसून बसलेला.
मी देखील लगेच निघाले.